लोणी काळभोर येथील एमआयटीच्या विद्यार्थिनीने खाजगी हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या


लोणी काळभोर :येथील एमआयटी विद्यापीठात बी.टेकचे शिक्षण घेणाऱ्या एका २१वर्षीय विद्यार्थिनीने लोणी काळभोर येथील राहिंज वस्ती परिसरातील खाजगी हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार २९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे.

 

आतिशा राकेशकुमार मयंक (वय २१) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात बी.टेक अभ्यासक्रमाच्या शिक्षणात होती. मिळालेल्या माहितीनुसार, अतिशा ही लोणी काळभोर येथील राहिंज वस्ती परिसरातील अक्षदा गर्ल्स हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होती. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अतिशाच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे तिच्या मैत्रिणींच्या लक्षात आले. बराच वेळ आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, मैत्रिणींनी तातडीने लोणी काळभोर पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, सहाय्यक फौजदार रामदास मेमाणे, महेंद्र आगळे व अन्य पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहचले. नागरिकांच्या सहाय्याने दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा उघडल्यानंतर अतिशा ही खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तातडीने तिला खाली उतरवून उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अतिशाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमकेकारण स्पष्ट होणार आहे. मात्र, अतिशाने टोकाचे पाऊल का उचलले, यामागे कोणते मानसिक, शैक्षणिक किंवा वैयक्तिक कारण होते का, याचा सखोल तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

संपादक – अमोल अडागळे, रियाज शेख


2
कृपया वोट करा

राष्ट्रीय वार्ताच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!